Chhagan Bhujbal : धनंजय मुंडे प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. ते परळीतच आहेत. त्याचवेळी, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित राहतील की नाही, याबाबत चर्चा सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये आज अधिवेशन होत आहे. अधिवेशनात काय घडणार यापेक्षा, अधिवेशनात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि वादात अडकलेले धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाही, याबद्दलच अधिक चर्चा सुरू होती. मात्र, धनंजय मुंडे प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला हजर राहू शकले नाहीत आणि ते परळीमध्येच आहेत. त्याचवेळी, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येणार की नाही, याबद्दल चर्चा होती. छगन भुजबळ अधिवेशनाला पोहोचले आहेत, मात्र त्यांची नाराजी कायम असल्याचे विमानतळावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले आहे.
पूर्णवेळ अधिवेशनाला थांबणार नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर छगन भुजबळ यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, प्रफुल पटेल काल येऊन बसले होते. सुनील तटकरे यांनी सुद्धा अधिवेशनाला या अशी विनंती केली होती. त्यामुळे मी अधिवेशनासाठी आलो आहे, थोडा वेळ थांबून जाणार आहे. पूर्णवेळ अधिवेशनाला थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भुजबळ यांची पक्षावरील नाराजी कायम असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, अधिवेशनामुळे अजित पवार आणि छगन भुजबळ पहिल्यांदाच आमने-सामने येणार होते, आणि दोघांमध्ये काही चर्चा होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, भुजबळ यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत अधिवेशनाला पूर्णवेळ उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
भुजबळ यांची नाराजी अधिकच तीव्र झाली
मंत्रिमंडळात डावलल्यापासून छगन भुजबळ यांची नाराजी सातत्याने व्यक्त होत आहे. त्यांनी वेळोवेळी पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे भुजबळ हे अधिवेशनाला येणार की नाही याचीच चर्चा होती. आज छगन भुजबळ अधिवेशनाला पोहोचण्यापूर्वी त्यांचे पुत्र पंकज भुजबळ मात्र आधीच अधिवेशनाला हजर झाले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून भुजबळ यांच्या मनधरणीसाठी आवश्यक प्रयत्न झाले नसल्यामुळे त्यांची नाराजी आणखी वाढली. याच पार्श्वभूमीवर, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपकडे झुकत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला होता. फडणवीस यांनी त्यावेळी भुजबळ यांना काही काळ संयम बाळगण्याचा सल्ला दिला, त्यानंतर भुजबळ सहकुटुंब परदेश प्रवासाला निघाले होते.